Tuesday, January 29, 2019

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (1,145 मी.) आहे. गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.

सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.

गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरुशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचा बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.

जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात.हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते.